Video: मतदानाआधीच भाजपानं पहिली जागा जिंकली; ‘या’ खासदाराची बिनविरोध निवड!

0
20

लोकसभा निवडणूक मतदानाचे अद्याप सहा टप्पे शिल्लक असताना भाजपनं विजयाचं खातं उघडलं आहे. सूरत मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी आणि पर्यायी उमेदवाराचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला. तसेच इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सूरत लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात मुख्य लढत होती. मात्र काँग्रेसचे सूरत मतदारसंघाचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. त्यांच्या अनुमोदकांच्या सह्यांमध्ये विसंगती असल्याचा मुद्दा उपस्थित करत हा अर्ज बाद ठरवण्यात आल्याचे सांगितले जाते. कुंभानी आणि पर्यायी उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्याने येथील निवडणूक शर्यतीतून काँग्रेस ‘आऊट’ झाल्याचे चित्र आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.

निवडणूक अधिकारी सौरभ पारघी यांनी निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. तिन्ही अनुमोदकांच्या सह्यांमध्ये विसंगती असल्याचे कारण त्यांनी दिले. कुंभानी यांच्यासोबतच पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला.

या दोघांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अर्जांवरील अनुमोदकांच्या सह्यांमध्ये विसंगती आढळून आली. त्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यानंतर येथील आठ अपक्ष उमेदवारांनीही आपले नावे मागे घेतील. त्यानंतर मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले आहेत.