Monday, May 20, 2024

अहमदनगर बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले, कांदा लिलाव बंद…

अहमदनगर -नगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केट मध्ये सोमवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी कोसळल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.९) नेप्ती कांदा मार्केट मधील कांद्याचे लिलाव बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनानंतर पुन्हा लिलाव सुरु झाल्यावर १६५० रुपयांपर्यंत गेले. त्यामुळे यामागील नेमके गौडबंगाल काय असा सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकारने शनिवारी (दि.४ मे ) कांदा निर्यातीवरील बंदी हटवल्याचे जाहीर केले. त्यानंतर संपूर्ण राज्यात कांद्याच्या भावात वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीला आणण्यास सुरुवात केलेली आहे. सोमवारी (दि.६) झालेल्या लिलावावेळी तब्बल १ लाख ३७ हजार २५८ गोण्या कांद्याची आवक झाली होती तर १ नंबर कांद्याला २१०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे गुरुवारीही (दि.९) शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्री साठी आणला होता.एकूण १ लाख ५८ हजार गोण्यांची आवक झाली होती.

मात्र लिलाव सुरु झाल्यावर कांद्याचे भाव सोमवारच्या तुलनेत प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्याचे लक्षात येताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. काही शेतकऱ्यांनी ही बाब बाळासाहेब हराळ यांना फोनवर सांगितली. ही माहिती मिळताच हराळ यांच्यासह भाऊसाहेब काळे, प्रकाश पोटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले हे तातडीने नेप्ती मार्केट मध्ये गेले व त्यांनी शेतकऱ्यांसमवेत आंदोलनात सहभागी होत लिलाव बंद पाडले.

महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांचा दुपारी नेप्ती मार्केट मधील शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी यांच्या भेटीचा दौरा होता. काही वेळात लंके व त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, रामदास भोर, शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे हे ही तेथे आले. शेतकऱ्यांनी त्यांच्या पुढे आपल्या व्यथा मांडल्या. त्यावेळी लंके यांनी जिल्हा उपनिबंधकांना फोन करून कांद्याचे भाव अचानक कसे कोसळले याची चौकशी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

दरम्यान लिलाव बंद आंदोलन सुरु झाल्यावर बाळासाहेब हराळ भाऊसाहेब काळे, प्रकाश पोटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले व काही शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जावून निवेदन दिले. संगनमताने कांद्याचे भाव जाणीवपूर्वक कमी करणाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली.

केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. निवडणुकीच्या काळात सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली मात्र ती केवळ गुजरातच्या शेतकऱ्यांच्या कांद्या साठी आहे हे आता समोर आले आहे. हे मोदी सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. दोन दिवसापूर्वी २१०० रुपये भाव मिळालेला असताना आज अचानक ८०० ते ९०० रुपयांवर कसा येतो. यात आडते- व्यापारी लॉबिंग करत असून सत्ताधाऱ्यांची आणि आडत – व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप यावेळी बाळासाहेब हराळ यांनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles