राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडत आहेत. पक्षफुटीनंतर राजकीय नेत्यांकडून मोठमोठे गौप्यस्फोट देखील केले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांसोबत बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“मी जर शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो, तर १९९९ मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो. काँग्रेसने मला त्यावेळी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती”, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.
माध्यमांसोबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “ज्यावेळी १९९५ मध्ये आमचं सरकार गेलं. त्यावेळी शरद पवार यांनीच मला एमएलसी आणि विरोधी पक्षनेता केलं होतं. त्यावेळेला मी भाजप-शिवसेना सरकारविरोधात विरोधीपक्ष नेता म्हणून काम केलं”.
“तेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला होता. पण मी ‘वन मॅन आर्मी’ म्हणून लढलो होतो. तेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये होतो. पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे. मी १०० टक्के मुख्यमंत्री झालो असतो.””शरद पवार यांना ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर काढलं गेलं. काँग्रेस पक्ष ज्यावेळी फुटला. त्यावेळी मी सुद्धा शरद पवारांसोबत गेलो होतो. तुम्ही पवारांसोबत जाऊ नका, असं काँग्रेसमधील अनेक दिग्गजांनी मला सांगितलं होतं”.
“काँग्रेस तुम्हाला पुढच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करेल, असे मला अनेक फोन-मॅसेज आले होते. पण मी त्यांना सांगितलं की, मी शरद पवार साहेबांसोबत आहे”, असंही भुजबळ म्हणाले.