बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत मला कोणी विचारणा केली तर, चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये येऊन केलेल्या वक्तव्यामुळेच ही परिस्थिती ओढावल्याची तक्रार मी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे करणार आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या बैठकीत अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी हे वक्तव्य गंमत म्हणून केले, असे बैठकीला उपस्थित असलेल्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, अजितदादांचा स्वर थट्टेचा असला तरी यानिमित्ताने त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवल्याचे, असे काहीजणांचे मत आहे.
महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीमधून संपविणार. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे. चंद्रकांतदादांच्या या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र पडसाद उमटले होते.