राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाना साधला आहे. मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. पण त्यांनी सांगितलं माझी शपथ पूर्ण झाली. तुमची शपथ पूर्ण झालीय. मराठा समाजाला आरक्षण मिळालंय. तर मग सर्व्हेक्षण कशासाठी करत आहात? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. तसेच मी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, असा गौप्यस्फोट करून भुजबळ यांनी खळबळ उडवून दिली आहे.
नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांनाच थेट सवाल केला. मला म्हणता भुजबळ राजीनामा द्या म्हणतात. एक आमदार बडबडला भुजबळांना लाथ मारून मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. मला सर्वांना सांगायचं आहे मी राजीनामा दिला. 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अंबडच्या सभेला गेलो. मी राजीनामा दिला आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. 17 तारखेला पहिली ओबीसी सभा होती. त्याआधीच राजीनामा दिला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.






