बुऱ्हाणनगर मध्ये मा. मंत्री शिवाजी कर्डिले यांचा दिवाळी पाडव्यानिमित्त रंगला स्नेह मेळावा
नगर : भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार तथा नगर जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी ३० वर्षांपासून सुरु केलेल्या परंपरेनुसार याही वर्षी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या मेजवाणीला जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्त्यांनी हजेरी लावली, शिवाजी कर्डिलेंच्या दिवाळी फराळाचे यावर्षीचे आकर्षण ठरले, ते विखे आणि जगताप पिता-पुत्रांची हजेरी! विखे पिता-पुत्राच्या शेजारी बसून कर्डिले-जगताप व्याही फराळाचा आस्वाद घेतला. जिल्ह्यातील दिग्गज नेते एकाच रांगेत बसून सर्वसामान्यांसारखे मंडपात बसून दिवाळी फराळाच्या निमित्ताने मिसळ खात असल्याचे पाहून उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती. शिवाजी कर्डिले यांनी दिवाळी फराळासाठी जिल्ह्याभरातील लोकांना आमंत्रण दिले होते. कर्डिले यांच्या निवासस्थानी सकाळी नऊ वाजल्यापासून लोकांचे आगमन होत होते. कर्डिले देखील मंडपाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून स्वागत करत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना विशेष आमंत्रण होते. पालकमंत्री विखे यांचे दुपारी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील निवासस्थानी आगमन झाले. कर्डिले यांनी त्यांचे स्वागत केले. मंत्री विखेंच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र खासदार डाॅ. सुजय विखे आले. खासदार विखेंचे स्वागत कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिलेंनी केले. याचवेळी माजी आमदार अरुण जगताप हे देखील आले. हे सर्व प्रमुख कर्डिले यांच्या निवासस्थानी काही वेळ थांबले. कार्यकर्त्यांनी तोपर्यंत मंडपात या प्रमुखांच्या फराळासाठी ताटांचे नियोजन केले. टेबला शेजारी खुर्च्या लागताच सर्व प्रमुख पाहुणे मंडपात आले. गरमा-गरम मिसळ ताटात वाढली गेली. गरम पुरी, ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी, काळ्या मसाल्याती शेवगा, वाग्यांच्या भाजीबरोबरच गरमा-गरम जिलेबीने पाहुण्यांचे ताट भरून गेले. माजी आमदार अरुण जगताप यांच्या आग्रहास्तव खास शेंगदाण्याची चटणी मागवली गेली. फराळ सुरू असतानाच तिथे अक्षय कर्डिले आले. त्यांनी या प्रमुख पाहुण्यांना स्वतः च्या हाताने जिलेबी भरवली. त्याची सुरूवात त्यांनी खासदार सुजय विखेंपासून केली. कर्डिले-जगताप हे व्याही विखे पिता-पुत्रांच्या शेजारी बसले होते. हे दृश्य तिथे मंडपात उपस्थित असलेल्यांच्या नजरेतून सुटले नाही आणि चर्चेला उधाण आले.
या प्रमुखांचा फराळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंत्री विखे काहीवेळ कर्डिलेंच्या निवासस्थानी थांबून होते. तिथे त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामीण भागातून आलेल्यांच्या गाठीभेटी घेतल्या. काहींनी अडकलेल्या कामांविषयी म्हणणे मांडले. हे एेकून घेतल्यानंतर मंत्री विखे शिवाजी कर्डिलेंना पुन्हा एकदा शुभेच्छा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. याचवेळी कर्डिलेंचे जावई आमदार संग्राम जगताप मंडपात दाखल झाले. खासदार विखे, आमदार जगताप आणि अक्षय कर्डिले हे बराच वेळ एकत्र रमले होते. महापालिकेतील आजी-माजी नगरसेवकांनी देखील हजेरी लावली. या सर्वांची विविध मुद्यांवर चर्चा रंगली होती. लोकसभेच्या निवडणुकीपासून ते महापालिकेवर येत असलेल्या प्रशासक आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका हे मुद्दे यांच्या चर्चेत होते.
शिवाजी कर्डिले यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमांची परंपरा ही तीस वर्षांपासूनची आहे. कर्डिले हा कार्यक्रम पूर्वी मतदारसंघा पुरता मर्यादित असायचा. यावर्षी त्यांनी जिल्ह्यातील लोकांना आमंत्रण दिले होते. सकाळी नऊ वाजल्यापासूनच कर्डिले यांच्या निवासस्थानी लोकांची रेलचेल होती. दिवाळीच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आणि देण्यासाठी कर्डिले पिता-पुत्र मंडपाच्या प्रवेशद्वारावर दिवसभर उभे होते. फराळाचा आग्रह करत होते. प्रत्येकाची आवर्जुन विचारपूस करत होते. फराळ घेतल्याशिवाय कोणीही जावू नये, हा कटाक्ष कर्डिले पिता-पुत्र दोघेही पाळत होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत कर्डिले यांच्या निवासस्थानी लोकांची गर्दी होती.
नगर जिल्ह्यात नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमधील विजयी सरपंच, सदस्यांनी देखील हजेरी लावली होती. गट-तटाच्या राजकारणामुळे काही जण एकटेच भेटून घेत होते. नवनिर्वाचित सदस्यांनी एकत्र येत खुलेआम भेटत होते. समोरच्यांना सांगून आलो. त्यांनी देखील आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे हे सदस्य सांगत होते. महिलांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कर्डिलेंच्या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.
विकास कामाच्या माध्यमातुन नागरिकांशी एक आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे, दिवाळी पाडव्याचा फराळाचा कार्यक्रम हा राजकीय नसून ऋणानुबंधचा मेळावा आहे, त्यामुळे सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित राहत असतात, मी लोकसभा निवडणूक लढवली असल्यामुळे जिल्हाभर कार्यकर्ते जोडले गेले आहे, विधानसभेला माझा पराभव झाला, मला असे वाटले की जनता आता माझ्याकडे येणार नाही पण तसे न होता जनतेचे असलेले प्रेम पाहून मला समाधान वाटले, असे मा, मंत्री शिवाजी कर्डीले यांनी सांगितले. यावेळी आ, प्रा. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे, पांडुरंग अभंग. अण्णासाहेब म्हसे,सीताराम गायकर, काशिनाथ दाते, विठ्ठल लंघे, विवेक कोल्हे,विक्रम पाचपुते, सचिन जगताप, उपमहापौर गणेश भोसले, सचिन कोतकर , नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, डॉ, दीपक, राजेंद्र चोपडा, हभप जंगले महाराज आदींसह जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .