शिवसेनेमध्ये फूट पाडत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना सामोरी जाणार आहे. साहजिकच या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने रणनीती आखली असून, पक्षाच्या १० नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अलिकडेच उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांची संख्या वाढवली होती. आता त्याच नेत्यांवर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भ या ठिकाणच्या संघटना बांधणीची जबाबदारीही यानिमित्ताने सोपविण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दहा नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक, तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार संजय राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र आणि पुण्याची जबाबदारी सोपविताना नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरुर, मावळ या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.