ज्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपले राजकीय आयुष्य पणाला लावले व त्यांच्या नेतृत्वावार विश्वास ठेवला. आज त्यांनाच लोकसभेच्या उमेदवारीसाठी जिवाचा आकांत करावा लागत आहे. भाजपने शिवसेनेला वेठीस धरले असून, शिवसेनेतील नको असलेल्यांना बदलण्यासाठी चुकीचे सर्व्हे पुढे केले जात आहेत,’ असा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी केला.
शिवसेनेत बंड करून राज्यात सत्तांतर घडविताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 12 खासदारांनी साथ दिली. आता त्यांनाच उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. याबाबत बीडचे शिवसेनेचे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सौम्य असले तरी ते भाजपसमोर झुकणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, सध्या जे चित्र आहे ते युतीसाठी घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच नको असलेल्या शिवसेनेच्या खासदारांना टाळण्यासाठी भाजपकडून चुकीचे सर्व्हे पुढे करून पक्षाची फसवणूक केली जात आहे. सर्व्हेचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत असे सांगितले जात असल्याचे प्रा. सुरेश नवले म्हणाले.