नगर – पूर्ववैम नस्यातून झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या दोन गटात पोलीस ठाण्यासमोरच राडा झाला. एकमेकांवर दगडफेक करून लोखंडी गजाने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२०) दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यासमोर घडला. याप्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत दोन्ही गटाच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साहिल जावेद शेख (वय १९), अमीन शब्बीर शेख (वय २८), सोहेल युनुस शेख (वय २४), गणेश विलास ससाणे (वय २५), अनीश जाकीर शेख (वय २२), राजु रामेश्वर कांबळे (वय २२), रोहित मच्छिंद्र उल्हारे (वय २५), अशोक नवनाथ लोंढे (वय २४) व रोहन काशिनाथ जगताप (वय १९, सर्व रा. रामवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही गटातील व्यक्तींची नावे आहेत.
रोहित बाळु भागवत (वय २०, रा. रामवाडी) व रोहन राजु गायकवाड (वय १९, रा. रामवाडी) यांच्यात पूर्ववैमनस्यातून मंगळवारी सकाळी वाद झाले होते. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी ते दोघे तोफखाना पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी दोघांची तक्रार घेत अदखलपत्र गुन्हे नोंदविले. दरम्यान तक्रारदरांच्या बाजूने आलेल्या नऊ जणांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या बाहेर चांगलाच गोंधळ घातला. एकमेंकावर दगडफेक केली. लोखंडी गज हातात घेऊन हाणामारी केली. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व पथकाने तत्काळ दोन्ही गटातील व्यक्तींना ताब्यात घेतले व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यात तक्रारदार यांनी सदरचा प्रकार केला नसून त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींनी एकमेकांवर दगडफेक करून हाणामारी केल्याचे पोलिसांनी सांगितले.