शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना नारायण राणे यांनी त्यांना मानसिक त्रास कुणी दिला, याबाबत बोलायला सुरूवात केली. यावर नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला. तसेच नारायण राणे यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उठून सभागृहातून बाहेर पडले. यावेळी नारायण राणे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावर भुजबळ हे नारायण राणे यांना हात दाखवून पुढे गेले. त्यावर नारायण राणे यांनी शाब्दिक कोटी करण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे म्हणाले की, मला छगन भुजबळ यांचे समर्थन आहे. त्यामुळेच त्यांनी मला हात दाखवला. त्यामुळे औचित्यभंग झाल्याचा मुद्दा उपस्थित करत नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. नीलम गोऱ्हे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सांगून नारायण राणे यांचे भाषण थांबवण्याची मागणी केली. पण नारायण राणे यांनी भाषण थांबवण्यास नकार दिला. राणेंनी ‘मी नाही थांबणार’ असं म्हटलं. “मी बसून बोलणाऱ्यांची ऐकत नसतो”, असा टोलाही राणे यांनी गोऱ्हे यांना लगावला. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी राहुल नार्वेकर यांच्या दिशेने पाहत, ‘हे काय चाललंय? कितीवेळ चालणार?’, असे म्हणत पुन्हा एकदा नापंसती व्यक्त केली. त्यानंतर नारायण राणे यांनी थोड्यावेळातच आपले भाषण आवरते घेतले.






