वर्धा जिल्ह्यातील एका तरुणाने गावचा वीज पुरवठा 2 तासांपासून खंडीत झाल्यामुळे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावल्याची घटना घडली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींनी स्थिती अत्यंत हुशारीने हाताळत या तरुणाची समजूत काढली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या तोलामोलाचे काम सांगण्याचा सल्लाही दिला.
त्याचे झाले असे की, वर्धा जिल्ह्यातील केळझर गावात मुसळधार पाऊस झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे गावातील हर्षल नांनावरे नामक तरुणाने महावितरणचे अभियंता कार्यालयाशी संपर्क साधला. पण वीज पुरवठा सुरुळीत झाला नाही. अखेर त्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनी क्रमांक मिळवला. त्यावर फोन केला. हा फोन मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्याधिकाऱ्यांनी (ओएसडी) उचलला. त्यांच्याशी बोलून हर्षलने आपली कैफियत मांडली. त्याची समस्या ऐकून ओएसडीही चक्रावले. त्यानंतर, त्यांनी बाळा, किमान मुख्यमंत्र्यांच्या लायकीचे तरी काम सांग रे, असे सांगून त्याची समजूत काढली. त्यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
ऑडिओ क्लिप जशीच्या तशी…
हर्षल नांनावरे – हॅलो, एकनाथ शिंदे साहेब बोलता का सीएम?
ओएसडी – नाही, मी त्यांचा ओएसडी बोलतोय. तुम्ही कोण बोलता?
हर्षल नांनावरे – मी केळझर येथून बोलत आहे तालुका सेलू, जिल्हा वर्धा.
ओएसडी – बरं बरं, बोला.
हर्षल नांनावरे – आमच्या गावची वीज गेली आहे. ती मघापासून आली नाही. आम्ही MSEB ला फोन केला. पण लागला नाही.
ओएसडी – कधी गेलीय लाईन?
हर्षल नांनावरे – दोन तास झाले.
ओएसडी – दोन तास लाईन गेली तर तुम्ही सीएम साहेबांना फोन करणार? काय हो साहेब, सीएम साहेबांच्या लायकीचे तरी काम सांगा ना. दोन तास लाईट गेली म्हणून थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावणार का?
हर्षल नांनावरे – सर MSEB वाले फोन उचलत नाहीत.
ओएसडी – सीएम साहेब जनतेचे आहेत. ते त्यांचे सर्वच फोन घेतात. पण त्यांच्या लायक तरी काम सांगा ना, दोन तास वाट पाहू शकत नाही तुम्ही!
हर्षल नांनावरे – नाही सर आमचे क्लास होते म्हणून…
ओएसडी – अरे मित्रा मी ओएसडी बोलतोय. मी रॉकेलच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला. त्यानंतर अधिकारी झालो.
हर्षल नांनावरे – नाही सर, क्लास होता म्हणून…
ओएसडी – असे नसते करायचे मित्रा. तुझ्या भावना कळल्या. परंतु तुझ्याकडे पर्यायी गोष्टी आहेत. मोबाईलची लाईट आहे. दोन तासाने काही होत नाही.
हर्षल नांनावरे – ठीकंय, ठीकंय…
ओएसडी – दोन तासासाठी कुणी CM ला फोन लावतं का रे?
हर्षल नांनावरे – सॉरी…सॉरी
ओएसडी – सॉरी वगैरे काही नाही. काय कर MSEB ला फोन लाव. वादळ आहे का तिथं आता?
हर्षल नांनावरे – नाही सर, गेला येऊन कधीचा.
ओएसडी – पाऊस वगैरे असेल तर खबरदारी म्हणून वीज बंद करतात. पुन्हा एकदा चेक करतात. कुणाला शॉक लागू नये आणि सर्व यंत्रणा चेक कूरन मग लाईट येते. ठिक आहे.
हर्षल नांनावरे – हो ठीक आहे सर!






