महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी पंकजा मुंडेंना ओबीसींच्या मेळाव्याला पाठवलं नाही?

0
10

ओबीसी समाजाचा आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मोठा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भाषण केलं. या मेळाव्याला प्रत्येक पक्षाचे ओबीसी समाजाचे नेते आले होते. भाजप पक्षाचे देखील काही नेते या मेळाव्याला आले होते. या मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा फोटो झळकला. पंकजा मुंडे या मेळाव्यात येतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. पण पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. अखेर पंकजा मुंडे यांनी त्यामागील कारण सांगितलं आहे. पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या अनुपस्थितीचं कारण सांगितलं.

“ओबीसींचे अनेक मेळावे आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षांनी घेतले. भारतीय जनता पक्षानेदेखील ओबीसींचे मेळावे घेतले. पण हा मेळावा असा होता की, ज्यामध्ये माझा फोटो लागला होता. त्यामुळे या मेळाव्याला यावं, अशी समाजातील नागरिकांची इच्छा होती. हा सर्वपक्षीय मेळावा असल्यामुळे पक्षाकडून कोण जावे, याबाबतचा निर्णय राज्यातील पक्षाच्या टीमने घेतला. भाजपकडून आशिष देशमुख, देवयानी फरांदे हे या कार्यक्रमाला गेले होते”, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं.
“माझ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मी बहुजन नेता आहे. त्याची पुरस्कर्ती आहे. माझी सुरुवातीपासूनची भूमिका बघितली तर मराठा आणि ओबीसी समाजातील वाद, संघर्ष कमी होण्याकडे माझा जास्त कल आहे. कारण समाजातील गरीब आणि सामान्य माणूस यामध्ये पिसत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर मी वेळोवेळी माझी भूमिका स्पष्टसुद्धा केलीय. त्यामुळे मला तिथे वेगळं काही व्यक्त करण्याची गरज नव्हती. ती पिच छगन भुजबळ यांची होती. त्यांनी फूल बॅटिंग केलेली मी पाहिली. खूप दिवसांनी एक चांगलं भाषण बघायला मिळालं. त्यांच्या वयाचा, अनुभवाचा अंदाज घेता आणि मराठा समाजाच्या अस्वस्थेचा अंदाज घेता भविष्यात या प्रश्नावर मधला मार्ग निघेल याचा मला विश्वास आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.