Monday, May 20, 2024

नगर तालुक्यातील ‘या’ सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा बंद

नगर तालुक्यातील ‘या’ सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा बंद

जेऊर गावची ग्राम सुरक्षा यंत्रणा बंद
देयक भरण्यास ग्रामपंचायत उदासीन : नागरिकांमध्ये नाराजी
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्राम सुरक्षा यंत्रणा देयक भरण्याअभावी बंद झाली आहे. देयक देण्याबाबत ग्रामपंचायतची उदासीन भूमिका पाहून ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर गावामध्ये मोठा गाजावाजा करत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. आपत्कालीन समयी सदर यंत्रणेचा गावासाठी मोठा फायदा होत होता. एका फोन कॉलवर आपत्कालीन घटनेची माहिती संपूर्ण गावाला समजत होती. गावात चोरी, अपहरण, वनवा, जंगली श्वापदांचा हल्ला, रस्ता लूट अशा घटना घडल्यास ग्रामसुरक्षा यंत्रणेचा मोठा फायदा होत असतो.
ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत जेऊर गावासाठी सुमारे सहा महिने यंत्रणा मोफत सुरू ठेवण्यात आली होती. ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू असताना परिसरात बिबट्याने घातलेला धुमाकूळ, कोरोनाचा काळ, इमामपूर गावातील भरदिवसा झालेली घरफोडी तसेच ढगफुटी होऊन निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती च्या काळात सतर्कता म्हणून ग्रामस्थांना या यंत्रणेचा मोठा फायदा झाला होता. ग्रामस्थांना या यंत्रणेमार्फत आपत्कालीन घटनेची माहिती मिळत होती. याच यंत्रणेमार्फत ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी वसुली बाबत व इतर सूचना ग्रामस्थांना देण्यासाठी उपयोग करू शकते.
माणसी वार्षिक ५० रुपये एवढ्या माफक दरात ही सेवा उपलब्ध आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे पैसे भरण्यासाठी अधिकृत रित्या ग्रामपंचायतला परवानगी देण्यात आली आहे. परंतु जेऊर ग्रामपंचायतीने ग्राम सुरक्षा यंत्रणेचे पैसे जमा न केल्याने सुमारे दोन महिन्यांपासून ग्राम सुरक्षा यंत्रणा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेबाबत ग्रामपंचायत एवढी उदासीन का ? असा सवाल ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ग्राम सुरक्षा यंत्रणा गरजेची
तालुक्यातील सर्वात मोठे जेऊर गाव आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावर होणारी रस्ता लूट व इतर गुन्ह्यांवर आळा बसण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू राहणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने हा विषय गांभीर्याने घेत ग्राम सुरक्षा यंत्रणा तात्काळ सुरू करणे गरजेचे आहे.
….. विकास म्हस्के

गावातील कचऱ्याची अवस्थाही बिकट
गावांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचऱ्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतही ग्रामपंचायतीकडून काही ठोस पावले उचलली जात नाहीत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात ग्रामसभेत चर्चा झाली पण कारवाई झाली नाही. तरी ग्रामपंचायतीने कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी.
….. विजय पाटोळे (माजी ग्रामपंचायत सदस्य)

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles