बारावीच्या प्रश्नपत्रिका जळाल्या की जाळल्या? विखे पाटील यांनी व्यक्त केला संशय

0
597

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाच्या प्रश्नपत्रिका त्यात जळाल्या होत्या. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘आगीचीही घटना अतिशय गंभीर आहे. प्रश्‍नपत्रिका जळल्‍या की, जाळल्‍या याची उच्‍चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात भरती प्रक्रीयेसह कोणतीही परीक्षा पारदर्शकपणे होवू शकलेली नाही. अशा परीक्षांच्‍या प्रश्‍नपत्रिका फुटण्‍याचे प्रकार वारंवार घडले आहेत. त्यामुळे या सरकारच्‍या काळात सर्वच परीक्षा संशयाच्‍या भोव-यात अडकल्‍या आहेत. म्हणूनच दहावी बारावीच्‍या परीक्षा तोंडावर आल्‍या असताना प्रश्‍नपत्रिका घेऊन जाणा-या टेम्‍पोला लागलेल्‍या आगीची घटना अतिशय गंभीर वाटते. परीक्षा महामंडळाने तांत्रिक कारण सांगून पेपरच्‍या तारखा नव्‍याने जाहीरही करून टाकल्‍या. परंतू आगीमागील नेमके तांत्रिक कारण कोणते? हा प्रश्‍न अनुत्‍तरीतच राहतो. प्रश्‍नपत्रिका जळाल्‍या की, जाळल्‍या याबाबत कोणताही खुलासा परीक्षा मंडळ करु शकलेले नाही,’ असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.