Monday, May 20, 2024

लष्करात लेफ्टनंट असल्याची बतावणी करून युवकांची फसवणूक, नगर जिल्ह्यातील तोतयाला बेड्या

सैन्य दलात लेफ्टनंट असल्याची बतावणी करून नोकरीच्या आमिषाने तरुणांना फसविणारा आरोपी नवनाथ सावळेराम गुलदगड (वय 24, रा. आंग्रेवाडी, म्हसैगाव, ता. राहुरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लष्कराच्या इंटेलिजन्स ब्युरोची दक्षिण कमांड आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

नवनाथ गुलदगड लष्कराचा गणवेश घालून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारवर कमांडो असे लिहून संगमनेर, राहुरी परिसरात फिरत होता. लष्करात भरती होऊ इच्छिणार्‍या तरुणांना लष्करात अधिकारी पदावर कार्यरत असल्याचे सांगत होता. काही तरुणांना कर्नल, कॅप्टन तर काहींना सुभेदार पदावर कार्यरत असल्याचे सांगून त्यांच्याकडून लष्करात भरती करण्याच्या आमिषाने पैसे घेत होता. लष्कराच्या इंटेलिजन्स ब्युरोच्या दक्षिण कमांड विभागाला माहिती मिळाली. लष्कराने ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिली. या माहितीच्या आधारे लष्कराच्या इंटेलिजन्स ब्युरो आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपी नवनाथ गुलदगड याची शोध मोहिम सुरू केली.

मांडवा बुद्रुक (ता.संगमनेर) येथे तो आल्याची माहिती मिळाली. संयुक्त पथकाने मांडवा गावात जाऊन त्याला नाव, पत्ता विचारला असता, त्याने आपण लष्करात बंगळूर (कर्नाटक) येथे लेफ्टनंट पदावर असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले. लष्कराच्या इंटेलिजन्स ब्युरोमधील अधिकार्‍यांनी लष्करातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून या खात्री केली असता, तो लष्करात कोणत्याही पदावर नसल्याचे निष्पन्न झाले. त्याची झडती घेतली असता, बनावट ओळखपत्र, लष्करी अधिकार्‍याचा ड्रेस, नेमप्लेट, लष्करात भरती होण्यासाठी वेगवेगळ्या तरुणांकडून भरून घेतले फॉर्म, नियुक्तीपत्र आदी साहित्य आढळून आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles