‘राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस’, शिंदेसेनेच्या आमदाराचे वादग्रस्त विधान

0
27

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील एका विधानावरुन सध्या राजकीय वातावण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी यांनी परदेशामध्ये बोलताना आरक्षण संपवण्याचे विधान केल्याचा दावा करत भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, असे धक्कादायक विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. या विधानावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

“राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासी सह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आले. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे, असे म्हणत जो राहुल गांधीची जीभ छाटेल , त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार,” असे धक्कादायक विधान बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. संजय गायकवाड यांच्या या विधानावरुन शिंदेंच्या आमदारांवर काही वचक आहे की नाही? असाच सवाल आता उपस्थित होत आहे.

११ लाखांचे बक्षीस..
“महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागण्यांची आग लागलेली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी देशातील आरक्षण संपणवण्याचे विधान केले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी फेक नेरेटिव्ह सेट करुन मते घेतली. आज त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. काँग्रेसचा चेहरा अन् मळमळ त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. माझं आव्हान आहे, जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस माझ्या वतीने देईल,” असे संजय गायकवाड म्हणालेत.