Ahmednagar breaking: वाडिया पार्क समोरील झेरॉक्स सेंटर वर सुरु होता भलताच ‘उद्योग’

0
20

टेक निओ पब्लीकेशन कंपनीच्या पुस्तकाची अनाधिकृतपणे झेरॉक्स कॉपी काढून पुस्तके तयार करून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाडिया पार्क येथील श्रीराम झेरॉक्स सेंटरच्या देवराम बाजीराव गोरे (वय 50 रा. टांगे गल्ली, नगर) याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेक निओ पब्लीकेशन कंपनीचे आनंद अजित लुणावत (वय 38 रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई बुधवारी (दि. 3) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली. श्रीराम झेरॉक्स दुकानातून टेक निओ पब्लीकेशन कंपनीच्या पुस्तकांच्या झेरॉक्स कॉपीची विक्री होत असल्याची माहिती आनंद लुणावत यांना मिळाली होती. कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलिसांना पत्र दिले होते.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लुणावत यांच्यासह बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास वाडिया पार्क येथील श्रीराम झेरॉक्स दुकानावर कारवाई केली असता तेथे देवराम बाजीराव गोरे हा टेक निओ पब्लीकेशन कंपनीच्या पुस्तकांची अनाधिकृतपणे संगणकाचा वापर करून झेरॉक्स मशीनवर कॉपी काढून त्याची हुबेहुब कंपनीच्या पुस्तकाप्रमाणे पुस्तके तयार करून त्याची विक्री करत असताना मिळून आला. त्याच्या दुकानातून एक हजार 170 रूपयांचे पुस्तके व पाच हजाराचा सीपीयु असा 6 हजार 170 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.