नगर अर्बन बँक घोटाळा…बडे मासे पकडा, मालमत्ता जप्त करा…कोर्टाचे निर्देश..

0
21

: नगर अर्बन को ऑप बॅंकेच्या कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करावेत, अशी सूचना न्यायालयाने पोलिसांना केली आहे. तसेच तपासी अधिकाऱ्यांना गुरुवारी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणाच्या गुन्ह्यात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेले बँकेचे माजी अध्यक्ष अशोक कटारिया, माजी संचालक अनिल कोठारी व मनेष साठे या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत होती. या तिघांना पुन्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत चित्रे यांच्यापुढे हजर करण्यात आले. तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सरकारतर्फे सरकारी वकील मंगेश दिवाणे तसेच फिर्यादीच्या वतीने वकील अच्युत पिंगळे यांनी बाजू मांडली. अनेक ठेवीदारही आज न्यायालयात उपस्थित होते.

छोट्या आरोपींबरोबरच मोठे आरोपी पकडा, गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झालेल्या आरोपींच्या मालमत्ता तहसीलदारांच्या मदतीने शोधा, कोणाच्या निनावी मालमत्ता असतील तर संबंधित व्यक्तीच्या खात्यावर झालेल्या संशयित व्यवहाराची माहिती घेऊन त्याही जमा करा, त्यातून वसुली करून ठेवीदारांच्या देणी द्या, पोलीस तपासात प्रगती करून ठेवीदारांची देणी देण्यास प्राधान्य द्या, अशीही सूचना न्यायालयाने पोलिसांना केली.

या गुन्ह्याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत होत आहे. या शाखेचे उपअधीक्षक म्हणून नवीन अधिकारी नियुक्त होत आहेत. त्यांना गुरुवारी न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. बँकेचे माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्जदार यांच्याविरुद्ध सुमारे १५० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

पोलिसांनी करून घेतलेल्या ‘फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट’मध्ये २९१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच १०५ जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये तिघे माजी संचालक तर दोघे शाखाधिकारी आहेत.