वसुली होईना… मनपाच्या ४ अधिकाऱ्यांसह ६० कर्मचाऱ्यांचे पगार थांबविले….

0
21

नगर: महापालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अखेर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी अखेर कारवाईचा बडगा उचलला आहे. ४ प्रभाग अधिकाऱ्यांसह ६० वसुली कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच कारणे दाखवा नोटिसाही बजावल्या आहेत.

वसुली वाढत नसल्याने तसेच वसुली कर्मचारी व प्रभाग अधिकाऱ्यांकडून बड्या थकबाकीदारांवर जप्ती कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने, मनपा आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे मनपाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चारही प्रभाग अधिकाऱ्यांसह ६० वसुली लिपिकांचे पगार थांबवण्याचे आदेश प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात प्रभाग अधिकारी, कर निरीक्षक व वसुली लिपिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शहरातील मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी २५० कोटींवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात अवघी ५० कोटी रुपये वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण २० टक्के आहे.