अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त खासदार डॉ. सुजय विखे पाटील परिवाराकडून नगर जिल्ह्यात मोफत साखर आणि दाळ वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. नगर शहरातील एका प्रभागात हा कार्यक्रम होता. त्यावेळी विखे पाटील यांनी नगर शहरातील नागरिकांसाठी एक बक्षीस योजना जाहीर केली. ‘मेरे घर आए राम’ असे नाव स्पर्धेला देण्यात आले आहे. २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मूर्तीची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आपल्या घरात, प्रभागात आणि परिसरात प्रभू श्रीरामच्या स्वागतासाठी काय उपक्रम केला आहे, याची माहिती छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून पाठवायची आहे. यासाठी व्हाॅट्सअप क्रमांक देण्यात येईल. यातून प्रत्येक प्रभागातून तीन क्रमांक काढले जातील. स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या घरातील प्रत्येकी दोन सदस्यांना विखे कुटुंब स्वखर्चाने विमानाने अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घडविणार आहे.
स्पर्धेची घोषणा करतानाचा विखे पाटील यांनी वाटप केलेल्या दाळ आणि साखरेपासून लाडू तयार करण्याचा आग्रहही लावून धरला.