नगर : शिवसेनेतून फुटून गुवाहटीला गेलेले १६ आमदार नैतिकदृष्ट्या अपात्र होणे आवश्यक होते. मात्र, राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता, काय होईल हे सांगता येत नाही. येत्या ३१ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर निकाल लागण्याची शक्यता आहे. आम्ही (शरद पवार गट) भक्कमपणे बाजू मांडली आहे. मात्र, शिवसेनेचा निकाल पाहता ३१ तारखेच्या निकालानंतर मीदेखील आमदार राहील की नाही, हे सांगता येत नाही, असे भाष्य आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. आमदार तनपुरे आज, गुरुवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आ. तनपुरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, सुरुवातीला आमचे चांगल्या प्रकारे सुरू असणारे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणा अथवा अन्य काही आमिषाला बळी पडून आधी शिवसेनेचे १६ आमदार गुवाहटीला गेले. हा प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्याच होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. त्यामुळे शिवसेना प्रकरणात निरपेक्ष निकाल अपेक्षित होता. मात्र, कालचा निकाल पाहिल्यानंतर राज्यातील जनतेचा हिरमोड झाला आहे.
आता आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठी अपेक्षा आहे. येत्या ३१ तारखेला राष्ट्रवादीबाबत सुनावणी असून, सध्याची परिस्थिती पाहता काय निकाल लागेल हे सांगता येत नाही, अशी भीती आमदार तनपुरे यांनी व्यक्त केली. सध्याच्या सरकार विरोधात प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावे लागत आहे. आमच्या सरकारच्या काळात दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेली कामे अद्याप सुरू होताना दिसत नाही. ही मनमानी सुरू असून, सर्वत्र टक्केवारीचे पेव फुटलेेले दिसत आहे. यामुळे विकासकामांना खिळ बसली आहे. राज्य सरकारच्या कार्यकाळात दोन दोन वर्षे काम सुरू होताना दिसत नाही. सत्ताधारी मंडळी सत्ता वाचवण्यात गुंग आहेत. एक-एका मंत्र्याकडे पाच पाच खाती असून यामुळे जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्याचे चित्र आहे, अशी टीका तनपुरे यांनी केली.