नगर : नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेच्या पहिल्या प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहिलेल्या एकूण १ हजार २० कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. या गैरहजर कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा दि. १५ एप्रिलला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. याही प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहिल्यास एकतर्फी कारवाईचा इशारा देणाऱ्या नोटिसा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बजावल्या आहेत.
नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी ३७३४ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी कोणते कामकाज करायचे तसेच मतदान यंत्र हाताळणी संदर्भात प्रशिक्षण वर्ग प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दि. ७ एप्रिलला आयोजित करण्यात आले होते.
मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर चार तसेच राखीव असे एकूण १६,६८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या सर्वांसाठी प्रशिक्षण वर्ग सहायक निवडणूक अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी आयोजित केले होते. मात्र, या प्रशिक्षण वर्गास दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण १०२० कर्मचारी गैरहजर राहिले. विधानसभा मतदारसंघनिहाय गैरहजर कर्मचाऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे- नगर मतदारसंघात शेवगाव १२०, श्रीगोंदा ७२, कर्जत- जामखेड १३०, नगर ७२, पारनेर ४९, राहुरी ६८ एकूण ५११ तर शिर्डी मतदारसंघात अकोले ८०, कोपरगाव १३१, नेवासा ८६, श्रीरामपूर ४८, संगमनेर ९९, शिर्डी ६०, एकूण ५०९. दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण १०२० कर्मचारी गैरहजर होते.