नगर: कोणीतरी आमदारकीचा राजीमाना देवून नगरच्या खासदारकीवर जर नजर ठेवत असेल तर आम्ही सहन करणार नाही. हे पारनेर नाहीये नगर आहे. नगरी झटका काय असतो तो आम्ही १३ मेला त्यांना दाखवून देणार आहोत. त्यांनी पारनेर एमआयडीसी खाल्ली आता नगरची एमआयडीसी त्यांना खाऊ देणार नाही. तुमची दादागिरी नगर शहर सहन करणार नाही. नगरकरांना उच्चशिक्षित, अभ्यासू व विकासकामे करणारे खासदार पाहिजे आहे. त्यामुळे आपण आपली ताकद दाखवून भाजपच्या सुजय विखेंना तीन लाख मताधिक्याने विजयी करूया, असा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हध्यक्षा अॅड.अनिता दिघे यांनी केला.
भाजपाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगर शहर भाजपच्या वतीने प्रभाग १५ मधील आगरकर मळा, आनंद कॉलनी व स्टेशन रोड परिसर मोठे शक्ती प्रदर्शन करत परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबूशेट टायरवाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हध्यक्षा अनिता दिघे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर उपाध्यक्ष सचीन पारखी आदींसह मोठ्या संख्येने महायुतीच्या घटकपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.