नगर : शेअर बाजारातील गुंतवणुकीत ३० ते ५० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगर शहरातील एकास ३० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या संदर्भात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजेंद्र जनार्दन भोसले (रा. आनंदनगर, स्टेशन रस्ता, नगर) यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यांना ‘बी वन स्क्रोडर्स सिक्युरिटीज’ या व्हॉट्सअपवरील ८०९२३६४०३७ या मोबाइल क्रमांकावरील व्यक्तीने शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर ३० ते ५० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून भोसले यांनी ११ फेब्रुवारी ते १० मार्च २०२४ या कालावधीत २९ लाख ९९ हजार ९९८ रुपये वरील क्रमांकावरील व्यक्तीकडे वर्ग केले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.