तापमानाचा पारा चाळीशीपार जाऊन उकाड्याचा त्रास होत असताना राज्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, धुळे, नंदुबार, बुलढाणा, यवतमाळ, परभणी, पंढरपूर, वाशिम, अकोल्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता. २९) पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी काही भागात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाल्याने फळबागांसह शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यात हवामानाची अशीच परिस्थिती राहिल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
पुढील ४८ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट देखील होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके झाकून ठेवावीत, असा सल्ला देखील हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासह बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील.
मराठवाड्यातील लातूर, बीड,धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पुण्यातील तापमानात घट होऊन दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.