घटनेनुसार शरद पवार पक्षाचे सदस्य नाहीत, तर मग ते एका पक्षाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात,’ असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी बुधवारी राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीदरम्यान केला. पक्षात कुठलीही निवड घटनेनुसार झालेली नसून शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नियुक्ती निवडणुकीशिवाय झाल्याचा दावाही वकिलांनी केला.
‘अजित पवार, इतर समर्थक आमदार अपात्र ठरू शकत नाहीत. शरद पवार यांनी एकट्याने पत्रकार परिषद घेऊन सरकारमध्ये जायचे नाही, हे कसे ठरवले? आमदारांनी शिवसेनेबरोबर किंवा भाजपबरोबर सरकार बनवू नये हे कुठे लिहिले आहे? शरद पवार यांनीच २०१४मध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिला होता, ही बाब वकिलांनी विधानसभाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी न होण्याबाबत पक्षाच्या धोरणासंदर्भात पक्षाध्यक्ष किंवा पक्षाच्या कार्यकारिणीकडून कोणतीही लेखी सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे अजित पवार आणि इतर समर्थक आमदारांच्या विरोधात कृती केल्याबद्दल अपात्र ठरू शकत नाहीत,’ असा दावाही त्यांनी केला.