Saturday, May 18, 2024

पारनेरकर सुरक्षित हातात रहावेत यासाठी विखेंना पाठिंबा… माजी आ. विजय औटींनी मांडली भूमिका…

पारनेर: राजकारण करत असतांना लोकांना समोर ठेवून महाविकास आघाडी सोबत जायचे की कुठे जायचे याची चर्चा केली. माझी जनता कोणाच्या हातात सुरक्षित राहिल हे मी पाहिले. तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणार आहेत. देश कोणाच्या हाता सुरक्षित राहिले हे पाहिले. देशाचे कृषीमंत्री असतांना हमीभावाचा कायदा का नाही करता आला असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार यांना करत खासदार सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. अजून त्यांना संधी मिळाल्यास मतदासंघात त्याचा फायदा होईल यासाठी महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिला असल्याचे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी स्पष्ट केले.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार विजय औटी यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर पाठिंब्याविषयी सविस्तर भुमिका मांडण्यासाठी पारनेर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी रोखठोक भूमिका मांडली.

यावेळी व्यासपिठावर उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, माजी सभापती गणेश शेळके, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी सरपंच सुरेश बोर्‍हुडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, नगरसेवक युवराज पठारे आदी उपस्थित होते.

माजी आमदार औटी म्हणाले, राजकारण करत असताना लोकांना समोर ठेवुन निर्णय घेतला. महाविकास आघाडी सोबत जायचे की कुठे यावर चर्चा केली. माझी जनता कोणाच्या हातात सुरक्षित आहे हे मी पाहीले. कोणालाही फोन केले नाही फक्त सोशल मिडीयावर व वर्तमान पत्रातुन आवाहन केले.

राज्यातील जल युक्त शिवार योजनेअंतर्गत, रस्ते निधी विविध योजनेतुन विरोधी पक्षात असताना कामे मार्गी लावली. लोकशाहीमध्ये सर्वांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. देशाचे नेते नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे ते पाहिले. देशाचे कृषीमंत्री असताना हमीभावाचा कायदा का नाही करता आला असा सवाल औटी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला.
कांद्याबाबत ठोस धोरण असायला हवे. कांदा साठवणूक करणे आवश्यक आहे. कांद्याला शाश्वत भाव मिळणे आवश्यक आहे. पाझर तलाव पाईपलाईन द्वारे भरुन देणार असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. ते त्यांच्याकडुन मी वदवून घेणार आहे.

पदावर काम करताना काही योजना समजुन घ्याव्या लागतात. खासदार सुजय विखे यांचा पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेता त्यांनी चांगले काम केले. त्यांना अजुन संधी मिळाल्यास मतदारसंघात त्याचा फायदा होईल. पक्षाने चुकीची भुमिका घेतली ती मी का स्वीकारावी. माझी भुमिका लोकाभिमुख आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे. देशाच्या लोकशाहीवर बोलणारा उमेदवार हवा असे औटी म्हणाले. तसेच त्यांनी खा. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

आमच्यासमोर सामान्य माणसाचे भुत उभे केले होते. जे झाले ते झाले आता सर्व एकत्र येऊन समोरच्या उमेदवाराचा खोटेपणाचा बुरखा फाडणार आहोत असे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले.
माजी सरपंच सुरेश बोरुडे म्हणाले, मी औटी साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्यांचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहे. लोकसभा निवडणुकीत नारायणगव्हाण परीसरातुन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना मताधिक्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles