मान्सून दाखल होताच महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सलग दोन तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, मागील दोन दिवसांपासून पावसाने काही भागात दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल. तसेच पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसतील. याशिवाय धुळे, नंदुबार, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.