Wednesday, May 15, 2024

सध्याच्या राजकीय घडामोडींवर संकर्षण कर्हाडेची भन्नाट कविता… दिग्गज राजकारण्यांनी केले कौतुक… व्हिडिओ

संकर्षण कऱ्हाडेच्या कविता रसिक प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस पडतात. देशात सध्या लोकसभा निवडणुकांचं वातवरण आहे. त्यातच कलाकारांच्या सोशल मीडिया पोस्ट, त्यांची वक्तव्य, त्यांच्या भूमिका या कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. संकर्षणनेही सध्याच्या राजकिय परिस्थितीवर ही कविता केली आहे.

तुम्हीही ऐका , पहा आणि मनापासून सांगा की तुमच्याही मनांत हेच आहे का ..? महाराष्ट्राच्या सध्या राजकीय परिस्थितीवर केलेली ही कविता अनेकांच्या पसंतीस उतरतेय. त्याच्या कवितेवर अनेकांनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.


संकर्षणची कविता…

सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं
खात्या-पित्या घरचे पण, दु:खी मला वाटलं.
माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं
अन् मी जवळ जाऊन म्हटलं काय हो काय झालं?
तुमच्यापैकी कोणाला काय झालंय का?
तिन्ही सांजेला असे बसलात कुणी गेलंय का?
कुटुंबप्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसास
डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते ढसाढसा
तर, ऐक तुला सांगतो म्हणाले, असं झालंय
आम्हा सगळ्या कुटुंबीयांचं एक-एक मत वाया गेलंय.
आता माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे ( नातवापासून त्यांनी ओळख करून द्यायला सुरुवात केली)
सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे
बरं एवढं करून मत दिलं, तरीही याचं भागलं नाही
पण, याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही.
मग, ती सभा, ती गर्दी, तो आवाज, ती घोषणा त्याचं पुढे काय झालं? मग, याचं मत पुढे तीन-चार वेळा असंच वाया गेलं.
आता माझ्या या दुसऱ्या नातवाची अन् त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाइफ आहे.
ना करिअर, ना ग्रोथ है…ना जिंदगी मैं वाइफ है.
अरे बाबा! वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कोणी आणत नाही.
भारतभर चालून तुझी पावलं दमली पण, हात काही चालत नाही.
मग ते धोतर, ती काठी, तो चष्मा, ते आडनाव त्याच पुढे काय झालं? आणि असं करत याचंही मत पुढे बरीच वर्षे वाया गेलं
आता माझ्या या मुलाला पण बरं का…राजकारणातलं फार कळतं. याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळतं
चुकली वेळ, झाला खेळ…वेगळंच संधान साधलं. एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वत:च्या हातावर बांधलं.
मग नवा साहेब, घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का?
की, जुन्या साहेबांबरोबर राहून तुतारीतून आवाज काढू का?
मग, ते वय, तो अनुभव, ती निष्ठा, तो परिवार त्याचं पुढे काय झालं? असं करत माझ्या या मुलाचं मत मात्र वाया गेलं.
आता माझी ही सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची. जरा कुणी नडलं ना, की घरातला बाण काढायची. मी तिला कितीदा म्हटलं, सूनबाई बाण जपून वापरायचा असतो गं…एकदा हातातून सुटला की, परत येत नसतो गं.
मग, जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली अहो! जिथे शब्दांनी आग लागायची, तिथे हातात मशाल आली.
मग तो बाण, तो बाणा, ते कडवट, ते सैनिक यांच्यात असं काय झालं? पण, असं करत माझ्या या सुनेचं मत मात्र वाया गेलं.
आता ही माझी बायको बरं का…घडवेल तेच घरात घडतं. नाव हीच लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं.
मी लगेच त्यांना विचारलं…माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल. अहो कमळ जिथल्या तिथेच आहे मग, यांचं मत वाया गेलं नसेल.
आजोबा म्हणाले, ती दु:खात नाहीये तशी पण, तिच्या मनात तळमळ आहे. कारण, ज्यांच्याविरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे.
अहो! ते विरोधक, हे सत्ताधारी, हे प्रामाणिक, ते बाजारी यांच्यात असं काय झालं? पण, असं करत माझ्या या बायकोचं आता वाटतंय मत मात्र वाया गेलं.
त्यामुळे पुढाऱ्यांनो तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की, हाच माझा पक्ष आहे. तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की, आमचं तुमच्याकडे लक्ष आहे.
त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मताची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांनो मतदान करा आणि लोकशाही जिवंत ठेवा!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles