Monday, May 6, 2024

नाराजीनंतर आरपीआयने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठिशी बांधली मोट

ना. आठवले यांच्या आदेशान्वये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार
महायुती सर्वांना बरोबर घेऊन बाबासाहेबांच्या विचाराने कार्य करत आहे -राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी)- महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने मागणी केलेल्या लोकसभेच्या दोन जागेवरुन निर्माण झालेली नाराजी दूर झाली असताना, नगर दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सर्व आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले. गुरुवारी (दि.25 एप्रिल) कोहिनूर मंगल कार्यालयात महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आरपीआयचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोणत्याही भूलथापा व अफवांना बळी न पडता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीसाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, महिला जिल्हाध्यक्षा जयाताई गायकवाड, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, कर्जत तालुकाध्यक्ष नागेश घोडके, माजी नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र आरोळे, सुरेश भागवत, दया गजभिये, गौतम कांबळे, नगर महिला तालुकाध्यक्ष कविता नेटके, कुसुमसिंह, मंगल भिंगारदिवे, विद्या सोनवणे, राहुरी महिला तालुकाध्यक्ष स्नेहल सांगळे, हिराबाई भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महायुतीचा घटक पक्ष म्हणून अनेक वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजप बरोबर आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात काम करण्याची संधी दिली. जागेच्या वाटपावरुन निर्माण आठवले यांची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भेट घेऊन दूर करण्यात आली आहे. महायुती सर्वांना बरोबर घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना बाबासाहेबांच्या कोणत्याही स्मृती जतन करण्याचे काम केले नाही. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर बाबासाहेबांचा महाराष्ट्रातील ठेवा जतन करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
श्रीकांत भालेराव म्हणाले की, आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. आठवले यांच्या आदेशावरुन जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार आहे. वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत आरपीआयला सत्तेत वाटा देण्याचे आश्‍वासन व जागा न दिल्याची उणीव भरून काढली जाणार असल्याचे आश्‍वासन देण्यात आलेले आहे. सर्व आरपीआयचे कार्यकर्ते नगर दक्षिणेत विखे यांचे कार्य करणार असून, त्यांना राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. या बैठकीत पुढील आठवड्यात आरपीआयच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या दक्षिण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त अथवा नवीन झालेली नाही. कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा करणाऱ्यांना पक्षाच्या घटनेप्रमाणे तो अधिकार नाही. निवडणुक काळात परिस्थिती संवेदनशील असताना पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आलेला नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भूलथापांना बळी न पडता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. आठवले यांच्या आदेशानुसार महायुतीच्या उमेदवारांचे काम करावे. -श्रीकांत भालेराव (आरपीआय, संपर्क प्रमुख)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles