अहमदनगर: लोकसभा निवडणुकीच्या सुरवातीच्या टप्प्यात तटस्थ राहिलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सांगितले.
विखे पाटलांना पाठिंबा देण्यामागची कारणेही औटी यांनी सांगितली. प्रचारात महाविकास आघाडीकडून देशाच्या संरक्षणासह इतर महत्त्वाचे विषय मांडले जात नाहीत, स्थानिक मुद्द्यांना अवास्तव महत्व दिले जात आहे, महाविकास आघाडीचे घटक पक्ष असूनही आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. विखेंनी गेल्या पाच वर्षांत चांगले काम केले आहे. याच अनुभवाच्या आधारे ते पुढेही चांगले काम करू शकतील, त्यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचे औटी यांनी म्हटले आहे.
विखे पाटील यांनी पाच वर्षे चांगले काम केले आहे. त्यांना आणखी पाच वर्षे संधी मिळाली, तर या अनुभवाचा फायदा घेत ते चांगले काम करू शकतील. त्यातून एक अनुभव समृद्ध खासदार या भागाला मिळू शकेल असे आमचे मत झाल्याचे औटींनी सांगितले.
मी पंधरा वर्षे आमदार होतो. पाच वर्षांपूर्वी माझा पराभव होऊनही कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिले. माझ्याशी प्रामाणिक राहिले. आता त्या सर्वांना मी आवाहन करत आहे की, आजपासून आपण सर्वजण डॉ. विखे पाटील यांच्या प्रचारात सक्रीय होणार आहोत. कोणाला काही शंका असतील तर थेट माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन औटी यांनी केले आहे.
खा. सुजय विखे पाटलांना पाठिंबा का दिला? विजय औटींनी स्पष्टचं सांगितलं
- Advertisement -