Monday, May 20, 2024

७० वी वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, हरियाणा विजेता तर रेल्वे उपविजेता

७०वी वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा – अहमदनगर – महाराष्ट्र – २०२४.
हरियाणाने राष्ट्रीय जेतेपद खेचून आणले. राष्ट्रीय स्पर्धेतील त्यांचे हे दुसरे जेतेपद.
अहमदनगर:- हरियाणाने “७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत भारतीय रेल्वेचा कडवा प्रतिकार ३५-३० असा मोडून काढत विजेतेपद मिळविले. दरभंगा-बिहार येथे झालेल्या “५१व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” हरियाणाने बँक स्पोर्टस् बोर्डला नमवित पहिल्यांदा विजेतेपद मिळविले होते. नंतर त्यांना मुंबई – महाराष्ट्रात(२०१२) रेल्वे कडून, पटणा – बिहार येथे(२०१४) राजस्थान कडून, तर जोधपूर – राजस्थान येथे(२०१६-१७) सेनादल कडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले होते. तर २०२२ साली यजमान पद लाभलेल्या “६९व्या राष्ट्रीय स्पर्धेत” हरियाणाला उपांत्य फेरीत महाराष्ट्रा कडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय रेल्वे या अगोदर सलग ४वेळा विजेते होते.
अहमदनगर, वाडिया पार्क क्रीडा संकुलातील मॅट वर झालेला अंतिम सामना पहाण्याकरीता नगरकरांनी तुफान गर्दी केली होती. पंकज मोहितेने आपल्या पहिल्याच चढाईत गुण घेत रेल्वेचे खाते उघडले. पण १०व्या मिनिटाला ९-६ अशी आघाडी हरियाणाकडे होती. १२व्या मिनिटाला ९-९, तर १५व्या मिनिटाला ११-११ अशी पुन्हा बरोबरी झाली. १८व्या मिनिटाला पंकजने हरियाणाचे शिलकी २गडी टिपत हरियाणावर पहिला लोण देत रेल्वेला १७-१३ असे आघाडीवर नेले. सामना विश्रांतीला थांबला तेव्हा १८-१५अशी रेल्वेकडे आघाडी होती. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा रेल्वेकडे २७-२४ अशी आघाडी होती. शेवटची १-२ मिनिटे असताना हरियाणाच्या आशू मलिकने शिलकी २ गडी टिपत रेल्वेवर लोण देत ३१-३० अशी आघाडी घेतली. शेवटी ५ गुणांनी “७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेचा चांदीचा चषक उंचाविला.
हरियाणाच्या या विजयात आशू मलिकने १ बोनस व १२ गुण असे १३ गुण घेत महत्वाची भूमिका बजावली. मोहित गोयतने २ गुण, २ पकडीचे आणि एक अव्वल पकड करीत २गुण असे ६गुण घेत त्याला योग्य साथ दिली. क्रिशनने ४, तर जयदीपने २ पकडी करीत बचावाची बाजू उत्तम सांभाळली. भारतीय रेल्वेकडून पंकज मोहीतेने १ बोनस व ६ गुण असे ७ गुण मिळविले. एम. सुधाकरने ५ गुण घेत त्याला छान साथ दिली. सूरेंदर गिल, नितेश कुमार, परवेज भैस्वावाल यांनी प्रत्येकी ३-३ पकडीत गुण घेतले. तरी देखील रेल्वेला पाचव्यांदा जेतेपद राखण्यात अपयश आले. चंदीगडला पहिल्यांदाच उपांत्य फेरीत घेऊन जाणाऱ्या पवन शेरावतची उणीव रेल्वेला भासली असेल. स्पर्धेचे बक्षीस वितरण हॉकीचे आंतर राष्ट्रीय खेळाडू धनराज पिल्ले, शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत पार पडले. हरियाणाने अंतिम विजेतेपद मिळविल्याने महाराष्ट्राच्या खेळाडूंना व क्रीडा रसिकांना कुठे ना कुठे तरी चुटपुट लागून राहिली असेल. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राला ३८-३७ असे, तर भारतीय रेल्वेने चंदीगडला ५-५ चढायांच्या डावात ४३-४१ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. बाद फेरीपासूनचे सर्वच सामने चुरशीने खेळले गेले. त्यामुळे तुफान गर्दी करून सामने पहाण्यासाठी आलेल्या सर्व नगरकर क्रीडा प्रेमींच्या डोळ्याचे पारणे फिटले असेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles