सध्या लग्नबंधनात अडकणारी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनल पवार. सध्या ‘कलर्स मराठी’च्या ‘रमा राघव’ या मालिकेत झळकणाऱ्या सोनलची आयुष्याचा नवा प्रवास सुरू करण्यासाठी तयार झाली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर स्वतःच्या मेहंदी समारंभाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “असा कसा बाई मला तुझा रंग लागला”, असं लिहित आणि होणाऱ्या नवऱ्याला टॅग करत सोनलने मेहंदीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मेहंदीच्या समारंभासाठी सोनलने खास भगव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्या हातावर आणि पायावर सुंदर मेहंदी काढली आहे. सोनलच्या मेहंदीमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव समीरसह, शिवनेरी बस, मस्तानी, मुंबई असं लिहिलेलं दिसत आहे. सोनलच्या मेहंदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. २८ डिसेंबरला ती समीर पालुष्टेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.