विखे परिवारावर प्रभू श्रीरामाची कृपादृष्टी -डॉ. सुजय विखे पाटील
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ
नागरिकांना साखर व डाळ वाटप
नगर (प्रतिनिधी)- विखे परिवाराला परमेश्वराची देणगी व प्रभू श्रीरामाची कृपादृष्टी असून, जनतेला जेवढे आंम्ही देत राहू, तेवढे खाली आमचे भरत जाते. यासाठी जनतेचे देखील आशीर्वाद मिळत राहते. कोण देऊ शकते आणि कोण नाही? हे सर्व जनतेला माहिती असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
शहरातील रेल्वे स्टेशन रोड, प्रभाग 15 मधील खोकरनाला येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करुन नागरिकांना साखर व डाळ वाटप करण्यात आले. यावेळी खासदार बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल शिंदे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, शहर सचिव दत्ता गाडळकर, विशाल खैरे, विजय गायकवाड, बाळासाहेब पाटोळे, युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयुर बोचुघोळ, आकाश कातोरे, पारुनाथ ढोकळे, ओंकार शिंदे, महेश लोंढे, विशाल खैरे, बाळासाहेब ठुबे, आशिष शिंदे, अविनाश गाजरे, विजय गायकवाड, रेखाताई विधाते, कुंडलिकराव गदादे, निलेश सातपुते, ओंकार थोरात, अक्षय कोंडवार, चैतन्य राणे आदींसह शिवसेना व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे खासदार विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथील राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावला. 22 जानेवारी रोजी मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या आनंदोत्सवासाठी प्रत्येकाच्या घरात गोड व्हावे, या भावनेने साखर व डाळ वाटपाचा उपक्रम सुरु आहे. या डाळ व साखर पासून प्रत्येक घरात प्रभू श्रीरामसाठी लाडूचे नैवेद्य तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर प्रसाद म्हणून तयार केलेले लाडू मारुती मंदिरात आणावे व सर्व लाडू एकत्र करून जवळील शाळेतील विद्यार्थ्यांना प्रसाद रूपाने वाटण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकात नगरसेवक तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात साखर डाळ वाटपाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रीप्रभू रामचंद्र यांचा अनेक वर्षाचा वनवास संपला असून, अयोध्येला मंदिर निर्माण होऊन प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. जेंव्हा राम वनवासातून परतले, त्याचप्रमाणे हा उत्सव भारतभर मोठ्या आनंदाने साजरा होणार असून, हा उत्सव करण्यासाठी गोड करण्यासाठी साखर व डाळ वाटपाचे त्यांनी कौतुक केले. तर खासदार विखे यांनी शहराच्या विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याने अनेक विकास कामे मार्गी लागली तर काही कामे अजूनही पूर्णत्वाला जात आहे. शहराच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले असल्याचे स्पष्ट केले.
अभय आगरकर म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शहरासह जिल्ह्याला विकासात्मक दिशा दिली. पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन विकासाला चालना देण्याचे काम केले. तर खासदार निधीतून अनेक काम मार्गी लागले. प्रभाग क्रमांक 15 मध्ये अडीच कोटी रुपये विकास कामासाठी मिळाले. विकासाची इच्छाशक्ती लागते. श्रीरामाची साथ असल्याने हा बदल घडत आहे. श्रीराम राष्ट्राचे प्रतीक असून, ते ठराविक जाती-धर्माचे नाही. मंदिरात प्रभू श्रीरामची प्रतिष्ठापना होऊन रामराज्य येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित नागरिकांना नियोजनबध्द पध्दतीने साखर व डाळ वाटप करण्यात आली. प्रारंभी भक्ती संध्येची मैफल रंगली होती. भक्ती गीतांमध्ये उपस्थित नागरिक रममाण झाले होते. जय श्रीराम…, सियावर रामचंद्र की जय…. च्या घोषणांनी परिसर दणाणला. आभार दत्ता गाडळकर यांनी मानले.
खा.विखे पाटील म्हणाले, आमच्या परिवारावर प्रभू श्रीरामांची कायम कृपादृष्टी…
- Advertisement -