बारामतीमध्ये शरद पवार गटाची सभा संपन्न झाली. या सभेला सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांची आई प्रतिभा पवार, आमदार रोहित पवार आणि इतर नेते उपस्थित होते. या सभेत बोलत असताना सुप्रिया सुळे काहीप्रसंगी भावूक तर काही प्रसंगी अतिशय आक्रमक होताना दिसल्या. कुणाचेही नाव न घेता त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. “मागच्या दहा महिन्यांपासून मी सहन करतेय. पण आता कधीतरी उद्रेक होईल”, असे सांगून त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला.
सुप्रिया सुळे आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाल्या, “मी पैशांसाठी सत्तेत आलेले नाही. कितीही पैसे कमवले तरी आपण काकडीची कोशिंबीर खातो. कुणीही सोन्याची कोशिंबीर खात नाही. आपण मोकळ्या हाती आलो आणि मोकळ्या हातांनीच परत जाणार आहोत. जगण्यासाठी आपल्याला नाती लागतात. नाती तोडायला ताकद लागत नाही. पण नाती जोडायला ताकद लागते. तुम्ही समोरून वार करत आहात. मलाही ‘आरे ला कारे’ करता येतं. पण आरे ला कारे न करता, गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते. ही ताकद एका महिलेतच असते.”