नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर होणारच, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे “अहिल्यानगर” मध्ये स्वागत करतो. 2014 आणि 2019 ला याच मैदानावर मोदींची सभा झाली होती. त्यापेक्षा अधिक रेकॉर्ड ब्रेक गर्दी यंदा झाली आहे. या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय झालाय. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले की, त्यांच्या आशिर्वादाने लवकर जिल्ह्याचे नाव “अहिल्यानगर” होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.