हैदराबादमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची १ मे रोजी हैदराबादमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्यानिमित्ताने रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत अमित शाह यांच्यासह तेलंगणा भाजपाचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. या रॅलीमधील काही फोटो समोर आले असून या फोटोमध्ये अमित शाह यांच्याबरोबर व्यासपीठावर काही लहान मुले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात तेलंगणा काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगाने याची दखल घेतली. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. तक्रारीनुसार, गुरुवारी अमित शाह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच अमित शाह यांच्याबरोबर टी यमन सिंह, भाजपाचे ज्येष्ठ नेते जी किशन रेड्डी आणि आमदार टी राजा सिंह यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.