राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुतीत परतले असून महायुतीने त्यांना परभणीतून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. जानकर हे सध्या परभणी मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. तसेच ते इतर मतदारसंघांमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. जानकर प्रामुख्याने बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार) यांच्या प्रचारात सर्वात पुढे आहेत. दरम्यान, जानकर यांनी बारमतीकरांना आवाहन केलं आहे की, त्यांनी सुनेत्रा पवारांना भरघोस मतं देऊन खासदार करावं. त्यानंतर आम्ही दिल्लीतून बारामतीसाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणू. हे मी भावी केंद्रीय मंत्री म्हणून बोलतोय. महादेव जानकर म्हणाले, तुमच्या २०० जागा येत असतील तर तुमचा पंतप्रधान कोण होणार आहे ते सांगा. तुमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार त्याचं नाव तरी सांगा. मी आत्ता सांगतोय, आम्ही या निवडणुकीच्या निकालानंतर सरकार बनवतोय. आम्ही एनडीएचं सरकार बनवतोय आणि मी भावी मंत्री म्हणून बोलतोय. सरकार आमचंच बनणार आहे.