नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ इच्छूक होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने येथे पुन्हा नव्याने उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. एकीकडे जरी, भुजबळांनी माघार घेतली असली तरी, राष्ट्रवादीने अद्यापही नाशिकच्या जागेवरून दावा सोडलेला नाही. हे सर्व घोंगडं भिजत असतानाच आता बीडमधील सभेत पंकजांनी प्रीतम मुंडेंची काळजी करू नका त्यांना आपण नाशिकमधून उभं करू असे म्हटले आहे. त्यामुळे भुजबळांच्या माघारीनंतर महायुती दुसरा ओबीसी चेहऱ्याचा शोध घेत आहे का? आणि त्यासाठी म्हणूनच प्रीतम मुंडेंच्या नावाचा विचार होतोय का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नाशिक लोकसभेसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंचे नाव आघडीवर असून, गोडसेंनी उमेदवारीबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनेकदा भेटी घेतल्या. मात्र, यानंतरही गोडसेंच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नसून, ते घोषणेच्या प्रतिक्षेतच आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.