अहमदनगर :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी वाकचौरेंना उमेदवारी जाहीर होताच मातोश्री गाठून नाराजी व्यक्त केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत वाकचौरे यांना शिर्डीतून विरोध असल्याचे त्यांनी ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर ठाकरे यांनी शिष्टमंडळाची समजूत काढून ‘आपला निर्णय झाला आहे, आता फैसला साईबाबांवर सोपवू,’ अशा शब्दांत विषय संपविल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
शिर्डीतून वाकचौरे यांचे नाव पुढे आले तेव्हापासूनच विरोध सुरू झाला होता. शिवाय बौद्ध समाजाला संधी द्यावी, अशीही मागणी पुढे आली होती. मात्र, पक्षाकडून वाकचौरे यांचीच उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यावर समन्वयक गायकवाड, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी तडक मातोश्री गाठून ठाकरे यांची भेट घेतली. वाकचौरे यांच्याबद्दलचे नागरिकांचे मत, वयोमानानुसार त्यांच्या मर्यादा, बौद्ध समाजाची मागणी या गोष्टी त्यांनी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. अजूनही वेळ गेलेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महिनाभराचा अवधी आहे, या काळात बदल करून नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. ‘आता आम्ही काही दिवस वाट पाहू, त्यानंतर निर्णय घेऊ’, असे गायकवाड यांनी सांगितले.
शिर्डीतून बंडखोरी होणार! भाऊसाहेब वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध
- Advertisement -