राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबावर सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राच्या मल्लाचे नाव कोरले गेले आहे. तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटील याने मैदान मारले. समाधान पाटील यांनी दिल्लीचे मल्ल बोलू खत्रीला आस्मान दाखवत मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला.
यंदाची हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा २०२४ तेलंगणा येथे पार पडली. यंदाची मानाची हिंदकेसरी गदा महाराष्ट्राकडे राहणार का? याबाबत कुस्ती शौकिनांमध्ये उत्सुकता होती. सोलापूरचा पैलवान समाधान पाटील आणि दिल्लीच्या बल्लू खत्री यांच्यामध्ये हिंदकेसरीची अंतिम लढत झाली. या लढतीत समाधान पाटील याने दिल्लीच्या मल्लाला आस्मान दाखवत मैदान मारले.
सलग दुसऱ्यावर्षी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेची गदा महाराष्ट्राच्या पैलवानांनी मारल्याने समाधान पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्यावर्षी अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर आस्मान दाखवत हिंदकेसरी कुस्तीचे मैदान मारले होते.
यंदाचा हिंदकेसरी विजेता पैलवान समाधान पाटील हा मुळचा सोलापूरचा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता सिकंदर शेखच्याच मोहोळ तालुक्यात त्याचे गाव. एकाच वर्षात महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी दोन्ही गदा मोहोळ तालुक्यातचं आल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे