महायुतीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या तीन पक्षांमध्ये ३२-१२-४ असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. या कथित फॉर्म्युलावर शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी संताप व्यक्त केला आहे. कीर्तिकर म्हणाले, या फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच जागावाटपावर आमच्या पक्षासह आमच्या मित्रपक्षांमध्ये कोणते नेते चर्चा करत आहेत, काय चर्चा करत आहेत याची आम्हाला काहीच माहिती नाही. आमचे मुख्य नेते पक्षाची भूमिका ठरवताना माझ्याशी आणि आमच्या पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. परंतु, १२ जागांचा हा कथित प्रस्ताव आम्हाला अजिबात मान्य नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे १३ खासदार आले आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी योग्य संरक्षण दिलं पाहिजे. त्यांना राजकीय स्थैर्य मिळायला हवं. आमच्याबरोबर दगाफटका व्हायला नको. शिवसेना काय भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही. आम्ही तशी बांधू देणारही नाही. आमच्याबरोर दगाफटका होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे.