ऐन लोकसभा निवडणूक आणि लग्नसराईची धामधूम सुरू असताना राज्यातील तब्बल २ लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला आहेत. एप्रिल महिना संपत आला, तरी देखील अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाहीये. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांवर आता आर्थिक संकट ओढवलं आहे. सरकारने तातडीने आमचा पगार करावा, अशी विनंती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने मुख्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे.
राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एक लाख अंगणवाड्या आहेत. ज्यामधे सुमारे २ लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार आणि लस देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात.
मात्र, शासनाकडून अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांचे पगार झाले नसल्यामुळे त्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या मानधनामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मार्च आणि एप्रिलचा पगारच नसल्याने कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे.जे मानधन आहे, ते पुरेसे नसतानाही तेही जर वेळेत मिळत नसेल तर महिला कर्मचाऱ्यांनी काम कसं करायचे असा सवाल अंगणवाडी कर्मचारी महिला करत आहेत. रखडलेले मानधन त्वरीत द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे.
सध्या लग्नसराई व शिक्षणाचा खर्च असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणे अपेक्षीत आहे. म्हणून विनाविलंब मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात यावे, असं अंगणवाडी कर्मचारी संघाने आपल्या पत्रात म्हटलं आहे.