Monday, May 20, 2024

राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाचे वेध… प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला फॉर्म्युला

सातारा:राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी आज सातारा जिल्ह्यातील फलटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “पक्षाचा कार्यकर्ता हा केंद्रस्थानी ठेवून हा राष्ट्रवादीचा परिवार संवाद महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन आला आहे. सामान्य कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत काम केले, त्यांच्या पक्षाकडून असणार्‍या अपेक्षा आम्ही जाणून घेत आहोत. मागील निवडणुकीत ११४ जागा लढवित असताना आम्ही ५४ जागांवर विजयी झालो. त्यापैकी उर्वरीत ६० ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. २०२४ च्या निवडणुकीत आपला पक्ष राज्यातील १ नंबरचा पक्ष बनविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे.”

विधानपरिषदेचे सभापती मा. रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील या आढावा बैठकीत आपले मनोगत व्यक्त केले. “आज मा. जयंतराव पाटील हे प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत आहेत. तसेच जलसंपदा मंत्री म्हणून दुहेरी भूमिका उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. फलटण तालुक्यातील सर्वच विभाग मजबूत व चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांचा इतिहास मागे वळून पाहिला तर कठीण काळात देखील या जिल्ह्याने पक्षाची साथ सोडली नाही. आज ठिकठिकाणी उफाळून येत असलेला जातीयवाद योग्य नाही. विकासाच्या मुद्यांवर राजकारण झालं पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचार यंत्रणा अवगत केली पाहिजे.”

या बैठकीस महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, आ. दिपक चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी समन्वयक सुहास कदम, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles