धुळे : सुरतहून आलेले दोन नेते महाराष्ट्राचे वैभव लुटून नेत आहेत. दिल्लीत आपले सरकार आणून महाराष्ट्रातील वैभव परत आणायचे आहे. आपल्याला घटनेचे संरक्षण करायचे असेल तर इंडिया अर्थात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले आहे.
धुळे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ मंगळवारी शहरातील जेलरोडवर ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर टीका करीत आहेत. हीच का त्यांची संस्कृती, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. आम्हालाही असे गोमूत्रधारी बुरसटलेले लोक नको आहेत. देशातील महिला अजूनही सुरक्षित नाहीत.
महिला खेळाडूंचे शोषण झाले. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले. रेवण्णा यांनी तर महिलांचे शोषण केले. तुमचे सरकार आल्यावर त्यांना केंद्रात महिला व बालविकास मंत्री करा, असा टोलाही ठाकरे यांनी हाणला. देशातील शेतकरी संकटात आहेत. राज्यात रोजगार नाही, सोयाबीन, कापसाला भाव नाही. ही शेतकर्यांशी गद्दारीच आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.