पारनेर : प्रतिनिधी राजकीयदृष्टया संवेदनशिल असलेल्या अळकुटी गावामध्ये झालेल्या आ. नीलेश लंके यांच्या प्रचारसभेसाठी मंगळवारी अळकुटीचे बाजारतळ तब्बल तीस वर्षानंतर खचाखच भरले होते. यापूर्वी शिवसेना शाखा स्थापनेसाठी दादा कोंडके यांच्या सभेसाठी हे बाजारतळ खचाखच भरले हाते.
यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, मी सरपंचपदापासून काम करण्यास सुरूवात केली, प्रत्येक पदाला न्याय दिला. मी प्रत्येकाचा फोन घेतला म्हणूनच आज खासदारकीचा उमेदवार आहे. विखेंची यंत्रणा बिंत्रणा काही नाही, घोगरे ताईंचा पाहुणा घरी पाठविला नाही तर नाव बदलेल. घोगरे ताईंनी त्यांची आरती करण्याची तयारी ठेवावी असे ते म्हणाले.
वीस बावीस वर्षापूर्वी तालुक्याला गुलाबराव शेळके यांच्या रूपाने संधी होती मात्र यश आले नाही. आता पुन्हा ही संधी आली असून आपल्याला या संधीचे सोने करायचे आहे. आता नाही तर कधीही अशी संधी येणार नाही. बाहेर असे चित्र रंगविले जाते की पारनेरमध्ये काही खरे नाही. हा स्वाभीमानी तालुका आहे. सेनापती बापट, अण्णा हजारे यांचा तालुका आहे. हा विकला जाणारा तालुका नाही. तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेना या दोनच राजकीय शक्ती आहेत. दोन पक्ष ऐकवटलेले असताना किमान एक लाख मताधिक्य मिळणार असल्याचा आत्मविश्वास लंके यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. भास्कर शिरोळे, डॉ.श्रीकांत पठारे, संजय मते, महेश शिरोळे, सचिन साखला, संतोष काटे, हनुमंत भोसले, संतोष नरसाळे, किरण पानमंद, श्रीकांत डेरे, संतोष येवले, गंगाधर शेळके, लक्ष्मण म्हस्के, तात्याभाऊ मेहेर, संतोष खाडे, कांचनताई दत्तात्रेय म्हस्के, संजय भालेराव, किरण दरेकर, डॉ. प्रवीण भालेराव यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
कोरोना काळातील कोरोना कामाची लाट
नीलेश लंके यांच्या कोरोना कामाची लाट आज आलेली आहे. या देशात, जगात कोरोना काळात उध्दव ठाकरे, नीलेश लंके यांनी मोठे काम केले आहे. त्यामुळे लंके यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे.
संजय मते
युवा नेते
तालुक्यात मोठे लीड घेणार
जो उमेदवार, पक्ष आपल्या रोजच्या गरजेला धावून येईल त्या पक्षाला, उमेदवाराला आपण मत दिले पाहिजे. समोरचा उमेदवार गरजेला धावून जाईल असा नाही. राष्ट्रवादी व शिवसेना या निवडणूकीत एकत्र असून नीलेश लंके हे पारनेर तालुक्यात मोठे लीड घेणार आहे.
डॉ. श्रीकांत पठारे
तालुकाप्रमुख
इंग्लिश बोलता की इंग्लिश पिऊन बोलता ?
इंग्लिश आम्हालाही बोलता येते, आम्हालाही जमते परंतू परिस्थिती अशी आहे, मराठी बोलून कोणी झिरो होत नाही आणि इंग्लिश बोलून कोणी हिरो होत नाही. ज्याला लोकांच्या भावना, वेदना, कळतात, दुःख कळते, अडचणीच्या काळात जो समाजासोबत उभा असतो तो खरा हिरो असतो. नगर जिल्हयात एकच हिरो आहे तो म्हणजे आ. नीलेश लंके. तुमचे खासदार मोठे अवघड आहेत, कांद्याचे भाव ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे नाही तर ते निसर्गावर अवलंबून आहे. आहो खासदार तुम्ही इंग्लिशच बोलता की इंग्लिश पिउन बोलता ?
यशवंत गोसावी
स्टार प्रचारक