अलिबाग : लोकसभा निवडणुकी आधी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू झाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचाच उमेदवार असावा, सुनील तटकरे उमेदवार नकोच अशी मागणी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. अलिबाग आणि माणगाव येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ही मागणी करण्यात आली.
गेल्या निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या पाठीशी पाच आमदार आणि एक माजी आमदार होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. संजय कदम, भास्कर जाधव आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात गेले आहेत. तटकरे यांनी वेगवेगळ्या तडजोडी करताना अनेकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार नकोच अशी थेट मागणी भाजपचे दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली. पक्ष नेतृत्वाने याचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.
रायगडचा पुढचा खासदार भाजपचा असावा ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ही भावना मी पक्षाच्या नेतृत्वाकडे कळविणार आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे कोकण संघटक रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले.