Tuesday, February 18, 2025

नगर जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस,नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहमदनगर दि. २० एप्रिल :- भारतीय हवामान खात्‍याद्वारे जिल्‍हयात २० व २१ एप्रिल, २०२४ रोजी वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तविलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे.

मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत , दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्‍सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणा-या , लोंबणा-या केबल्‍स् पासून दूर रहावे.

वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व वादळी वारा यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्‍यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे.

वादळी वारे, वीज आणि पाऊस यापासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्‍वनी क्र.1077 (टोल फ्री), 0241-2323844, 2356940 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles