नगर – निंबळक गावच्या शिवारात रेल्वे मार्गावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि.२६) सकाळी आढळून आला होता. त्याची ओळख पटली असून तो पारनेर तालुयातील सावरगाव काळेवाडी येथील असल्याचे समोर आले आहे. पहाटेच्या सुमारास रेल्वे गाडीच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला आहे. संभाजी भागाजी गायके (वय ३२, रा.सावरगाव काळेवाडी, ता. पारनेर) असे या मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह रेल्वे मार्गावर आढळून आला होता. याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच पो.ना.संदीप पितळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व रुग्णवाहिका बोलावून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. सुरुवातीला त्याची ओळख पटलेली नव्हती, मात्र घटनास्थळी एक मोबाईल तसेच रेल्वेमार्गाच्या बाजूला एक मोटारसायकल आढळून आली होती. त्या मोबाईल वर मयताच्या नातेवाईकांचा फोन आल्यावर पोलिसांनी त्यांना ही घटना सांगितली. त्यानंतर नातेवाईक दुपारी जिल्हा रुग्णालयात आल्यावर मयताची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- Advertisement -