स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता, स्वाभिमानाच्या संग्रामाची सुरुवात !
माजी आमदार निलेश लंके यांनी काढलेल्या नगर दक्षिण स्वाभिमान जनसंवाद यात्रेची आज सांगता होत आहे. यानिमित्त भावना व्यक्त करताना लंके यांनी म्हटले आहे की, गेले १९ दिवस आम्ही संपूर्ण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. गावागावात, वाड्या वस्त्यांवर जाऊन नागरिकांसोबत संवाद साधला. नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे, उद्विग्नता आहे, विश्वासघात झाल्याची भावना आहे. सर्वांना धीर देत, परिवर्तनाचा विश्वास देत आता आपण जनसंवाद यात्रेचा समारोप करत आहोत.
उद्याच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी आपल्याला लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, ज्येष्ठ नेते श्री. बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे नेते श्री. आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सर्व जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी याप्रसंगी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप होत असला तरी आता स्वाभिमानाच्या संग्रामाला खरी सुरुवात होणार आहे. या यात्रेत जनतेने सांगितलेल्या सर्व समस्यांवर, त्यांच्या व्यथांवर आपल्याला मार्ग काढायचा आहे. जोपर्यंत माझी मायबाप जनता समाधानी होत नाही तोपर्यंत हा संग्राम सुरूच असेल.